मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने शनिवारी मुंबईतून दोघांना अटक केली. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशी आरोपींची नावे आहेत. हत्येच्या कटात सहभागी होणे आणि हत्येनंतर पुरावे नष्ट केल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. या दोघांनाही सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आधीच अटकेत असलेल्या शरद कळसकरने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार पुनाळेकर आणि भावे यांनी दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल नष्ट करण्यासाठी मदत केली होती.

त्याचबरोबर हत्येवेळी दाभोलकरांची ओळख पटवण्यात आणि घटनास्थळाची रेकी करण्यात विक्रम भावेचा सहभाग असल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यासारख्या अनिष्ट रूढी- परंपरांविरुद्ध लढणारे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. राज्य पोलीस आणि सीबीआयचे पथक या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत होते. पाच वर्षे या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नव्हती. मागच्या वर्षी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयने सचिन प्रकाशराव अंधुरे याला अटक केली. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला थोडी गती मिळाली आणि त्यातून पुढे आलेल्या माहितीतून पुनाळेकर आणि भावे यांना अटक करण्यात आली.

‘सनातन’ संस्थेकडून अटकेचा निषेध
डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव ऍड. संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना केलेली अटक निषेधार्ह असल्याचे ‘सनातन’ संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी म्हटले आहे. केंद्रात हिंदुत्ववादी शासन सत्तारूढ असताना पुनाळेकर, भावे यांना अटक होणे यामागे षड्यंत्र असून पुरोगाम्यांच्या मागणीपुढे सीबीआय झुकली आहे. मालेगाव स्फोटप्रकरणी भगवा आतंकवादाचा खोटेपणा ज्यांनी सिद्ध केला त्या पुनाळेकरांना अटक करणे गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.