नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कराचे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. त्यामुळं काही वस्तूंवर अधिक कर लागेल तर काही वस्तूंवरचा कराचा भार कमी होणार आहे. जीएसटी परिषदेच्या ४७ व्या बैठकीत झालेल्या निर्णयांनुसार काही वस्तूंना जीएसटीमधून देण्यात आलेली सवलत हटवण्यात आली आहे. धनादेश देण्यासाठी बँका आता १८ टक्के जीएसटीची आकारणी करतील. प्रतिदिन हजार रुपयांपेक्षा अधिक असलेल्या हॉटेलच्या खोलीच्या भाड्यावर १२ टक्के कर लागेल. सोलर हिटरवर पूर्वी ५ टक्के लागणारा जीएसटी आता १२ टक्के झालाय. तर इलेक्ट्रॉनिक कचऱ्यावरचा जीएसटी ५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर गेलाय.
रोपवे नं होणारी वाहतूक आता स्वस्त झाली आहे. यापूर्वी रोप वे च्या माध्यमातून प्रवासी आणि मालवाहतूक करण्यासाठी १२ टक्के कर द्यावा लागत होता. आता ही रक्कम ५ टक्क्यांवर आली आहे. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांसाठीही ५ टक्के जीएसटी लागेल. ईशान्येकडची राज्यं आणि बागडोगराहून येणाऱ्या विमान प्रवाशांना जीएसटीमधून मिळणारी सूट आता केवळ इकॉनॉमी श्रेणीसाठी मर्यादित ठेवण्यात आली आहे. कुठलंही ब्रँडिंग नसलेल्या दाळी, पीठ यांच्या २५ किलोपेक्षा अधिक वजनाच्या पॅकिंगला जीएसटी लागणार नाही. किरकोळ विक्रीसाठी असलेल्या पॅकिंगला मात्र जीएसटी द्यावा लागेल, असं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलंय. तांदळाच्या ५० किलोचं पॅकिंगला मात्र जीएसटी द्यावा लागणार नाही.