पुणे : कोरोना प्रतिबंधाकरीता प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याविषयीचा आढावा घेण्याकरीता केंद्रीय स्तरावरील पथक पुण्यामध्ये दाखल झाले आहे. या पथकामार्फत पुणे महानगरपालिकेंतर्गत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि.च्या कार्यालयामध्ये कोरोना विषयीच्या अद्ययावत माहितीकरीता सुरु करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी वॉर रुमची पाहणी केली. यावेळी पथकामधील राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सह सल्लागार डॉ.पवनकुमार सिंग,अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक करमवीर सिंग, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय मल्होत्रा, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम,अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल, शांतनू गोयल, राजेंद्र मुठे हे उपस्थित होते.
यावेळी स्मार्ट सिटी वॉररुममध्ये ‘संयम’ या संगणक प्रणालीद्वारे कोरोना विषयीची माहिती प्राप्त करुन घेण्यात येते. यामुळे पुणे शहरामध्ये वॉर्डनिहाय होम कोरोंटाईन बाधितांच्या हालचालींविषयी माहिती तात्काळ नियंत्रण कक्षामध्ये प्राप्त होते. दर दहा मिनिटांनी यावर माहिती अद्ययावत होत असते. यामुळे डाटा प्राप्त होताच त्यावर तातडीने पुढील कार्यवाही करणे शक्य होते. यामध्ये रेड झोन, ऑरेंज झोन तसेच ग्रीन झोनमधील वॉर्ड निहाय बाधितांची माहिती तसेच पुणे शहरामधील विविध ठिकाणच्या रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांच्या अद्ययावत माहितीचे एकत्रिकरण करण्यात येते व त्यानुसार नियोजन करण्यात येते.
यावेळी या पथकातील सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी माहिती दिली. यावेळी या तयारीबाबत या पथकामार्फत समाधान व्यक्त करण्यात आले. यानंतर या पथकामार्फत वडगाव बुद्रुक येथील कै.ह.भ.प.शांताबाई खडसरे दवाखाना येथील फ्ल्यू सेंटरची पाहणी करुन तेथील उपचाराच्या नियोजनाबाबत वैद्यकीय अधिका-यांशी चर्चा केली.