मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातील कामांचा पर्यटन आणि पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. सन 2021-22 च्या आराखड्यानुसार उपनगर जिल्ह्यात सुविधांच्या निर्मितीसह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ही कामे नियोजित वेळेत तसेच दर्जेदार करण्याचे निर्देश श्री.ठाकरे यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

पालकमंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज एमएमआरडीएच्या सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२१-२२ च्या आराखड्यातील कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, परिवहन मंत्री अनिल परब, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबईतील खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, संपूर्ण मुंबईत सोयी सुविधा निर्माण करून आणि त्यामध्ये  नीटनेटकेपणा आणून मुंबईचे वेगळे, चांगले रूप निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी विविध ठिकाणी पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सिग्नल यंत्रणेमध्ये सुसूत्रता आणून ते आकर्षक बनविले जात आहेत. बेस्टचे बसस्टॉप आकर्षक आणि पारदर्शक करून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. खेळण्यासाठी मैदाने, उद्याने, तलावांचे सौंदर्यीकरण, रेल्वे स्थानकांबाहेरील रहदारीमध्ये सुधारणा, पावसाच्या पाण्यापासून किंवा दरड कोसळण्यापासून संरक्षणासाठी बांधलेल्या भिंती सुस्थितीत राखणे, त्या परिसरातील रहिवाशांना इतरत्र स्थलांतरीत करणे, चौपाट्यांचे सौंदर्यीकरण करणे, किल्ल्यांची योग्य निगा राखणे, कांदळवनाचे संवर्धन करणे त्याचबरोबर कचऱ्याचे विलगीकरण करून योग्य व्यवस्थापन करणे आदी बाबीही प्राधान्याने केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन कामांची गती वाढविली जाईल, त्याचबरोबर त्यांच्या सूचनांवर झालेल्या कार्यवाही बाबत त्यांना अवगत केले जाईल. आवश्यक प्रश्नांवर बैठक घेण्यात येतील, नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचे मुद्दे जाणून घेण्यात येतील. उपनगरातील नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करणे, पायाभूत सुविधांची निर्मिती करणे आणि नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघांमधील समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली. या समस्यांची सोडवणूक करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

विकास कामे करताना लोकोपयोगी व सर्वसामान्य जनतेच्या जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम करणाऱ्या कामांवर भर देण्याचे निर्देश श्री.ठाकरे यांनी संबंधित यंत्रणांना दिले. सन २०-२१ मधील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करून पुढील वर्षाचे नियोजन करताना शाश्वत विकासकामांच्या पूर्ततेवर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी पूर्व द्रुतगती मार्गावरील बोगद्याजवळ हँगिंग गार्डनसारखे गार्डन तयार होऊ शकेल, तसेच ट्रॉम्बे येथील जेट्टीचा विकास करता येईल, अशा सूचना केल्या. तर, खार येथे आयटीआय शेजारील जागेचा कौशल्य विकासच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत विकास करण्यात येईल, असे सांगितले.

सन 2021-22 मध्ये सर्वसाधारण योजनेसाठी ४४० कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ५१ कोटी तर आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी ५.५९ कोटी अशा एकूण ४९६.५९ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर असून यामध्ये मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी मनपास सहायक अनुदान, गलिच्छ वस्त्यांमध्ये संरक्षक भिंतीचे बांधकाम, लहान मासेमारी बंदरे, बंदरांचा विकास व प्रवासी सोयी, शासकीय महाविद्यालयांचा विकास, पर्यटन विकास, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विकास, अतिक्रमण रोखणे, पायाभूत सुविधा, विद्युत विकास, कौशल्य विकास, रूग्णालयांचे उन्नतीकरण, ग्रंथालयांचा विकास, मागासवर्गीयांचे कल्याण आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

प्रारंभी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी २०२१-२२ या वर्षातील प्रस्तावित कामांची माहिती देऊन सद्यस्थितीचा आढावा सादर केला. यामध्ये विविध ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण आधुनिक बसथांबे उभारणे, विविध चौकांच्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण रचनेचे ट्रॅफिक सिग्नल उभारणे, द्रुतगती मार्गांवर आधुनिक सुविधायुक्त सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणे, अत्याधुनिक सार्वजनिक सुविधा केंद्रे उभारणे, वर्दळीच्या ठिकाणी रिंगरोड बसमार्ग तयार करून समर्पित वाहतूक व्यवस्था तयार करणे, पर्यटन व मनोरंजन केंद्राच्या ठिकाणी सोयीसुविधा, उद्यानांचा विकास, लहान मोकळ्या जागांच्या ठिकाणी छोटी क्रीडांगणे, रस्त्यांवर आधुनिक पद्धतीचे मार्किंग, रस्त्यांवर एकाच पोलवर विविध प्रकारची चिन्हे प्रदर्शित करणे आदी कामांचा समावेश आहे. जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन केले.