पिंपरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देहु गटाच्या वतीने दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम परिसरातील साई उद्यान संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून शिल्पश्री शाहीर गणेशदादा चंद्रकांत टोकेकर (सदस्य, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, भारत सरकार) हे होते. त्यांनी खगोलशास्त्राच्या दृष्टीने राष्ट्रीय घडामोडी या विषयाची मांडणी करताना या पवित्र भारत भूमीला छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप यांच्यासारख्या महान लोककल्याणकारी राजांची परंपरा लाभली आहे.. त्यामुळेच अनेक आक्रमणे होऊन देखील आपला देश, धर्म टिकून राहिला. जगात भारत हा एकमेव देश आहे की, ज्याला भारतमाता असे संबोधले जाते. आपण सर्वजण भारतमातेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या स्वयंसेवी संघटनेतून देशभक्तीचे, राष्ट्रसेवेचे बाळकडू कायम मिळत असते, असेही त्यांनी आपल्या उद्बोधनातून सांगितले. भारतमाता पूजन व गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.

व्यासपीठावर देहू गटाचे संघचालक नरेश गुप्ता, जिल्हा सहकार्यवाह अमोल देशपांडे, कार्यवाह सचिन ढोबळे उपस्थित होते. प्रास्ताविक सचिन ढोबळे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत गटसंघचालक नरेश गुप्ता यांनी करून सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. वक्त्यांचा परिचय ओंकार खोल्लम, सूत्रसंचालन किशोर माने यांनी तर आभार प्रदर्शन गुरुराज कुंभार यांनी केले.

उपस्थितांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, सेवा कार्याची माहिती तसेच पर्यावरण जनजागृती, हरितगृह उपक्रमाची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचा लाभ घेतला. आरोग्यदायी स्वदेशी उत्पादनांचे स्टाँल लावण्यात आले होते. कार्यक्रमात कोरोना विषयक सर्व नियमांचे कटाक्षाने पालन करण्यात येत होते. कार्यक्रमाला संघाच्या विविध आयामाचे कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, माता, भगिनी सहकुटुंब उपस्थित होत्या. वंदे मातरम् होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.