नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मध्य प्रदेशातल्या कुनो इथल्या राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेले आठ चित्ते सोडण्यात आले. भारतातून नामशेष झालेल्या चित्ता या प्रजातीला पुन्हा एकदा या भूमीत अधिवास मिळावा, या उद्देशानं हे चित्ते नामिबियातून आणले असून हा जगातला पहिला आंतरखंडीय वन्यप्राणी स्थानांतरण प्रकल्प आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांनी चित्ता मित्र, चित्ता पुनर्वसन व्यवस्थापन गट आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारतानं या चित्त्यांना जागतिक स्तरावरच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करून नवा अधिवास दिला आहे, त्यांना इथं रुळायला थोडा अवधी देऊया, असं त्यांनी सांगितलं.
अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या दोन परस्परविरोधी संज्ञा नाहीत, असा संदेश एकविसाव्या शतकातला भारत संपूर्ण जगाला देत आहे, पर्यावरणाचं संरक्षण आणि अर्थव्यवस्थेची प्रगती एकाचवेळी साध्य करता येऊ शकते, याचं भारत हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे, असं ते म्हणाले.
गेल्या वर्षांत देशातली हत्तींची संख्याही ३० हजारांहून अधिक झाली होती, एके काळी आसाममध्ये एक शिंगी गेंड्यांचं अस्तित्व धोक्यात आलं होतं, मात्र आज त्यांची संख्याही वाढली आहे. वाघांची संख्या दुप्पट करण्याचं उद्दिष्ट मुदतीआधीच पूर्ण झालं आहे. देशातील ७५ पाणथळ जागा रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. भारताचे हे प्रयत्न यापुढेही निरंतर सुरु राहतील, देशाच्या या प्रयत्नांचा परिणाम पुढील शतकांपर्यंत दिसून येईल आणि प्रगतीचे नवे मार्ग दिसू लागतील, असं प्रधानमंत्री म्हणाले.