नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल पीएम केअर फंडाच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भुषवलं. चार हजार तीनशे ४५ मुलांना मदत करणाऱ्या पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन या योजनेसह पीएम केअर फंडाच्या मदतीनं हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. यावेळी बोलताना प्रधानमंत्री म्हणाले की, नवीन विश्वस्त आणि सल्लागारांच्या सहभागामुळे पीएम केअर फंडाच्या कामकाजाला व्यापक दृष्टीकोन मिळणार असून, सार्वजनिक जीवनाचा विश्वस्थांचा महत्त्वपूर्ण अनुभव आणि उपलब्ध निधीचा उपयोग विविध सार्वजनिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येईल.
प्रधानमंत्री केअर फंडात मनापासून योगदान दिल्याबद्दल मोदींनी देशातील लोकांचं कौतुक केलं. आपत्कालीन आणि संकटाच्या परिस्थितींना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी हा फंड केवळ मदत न करता उपाययोजना आणि क्षमता वाढवण्याची दृष्टीनं महत्त्वाचा असल्याबाबतही यावर चर्चा झाली. या बैठकीला पीएम केअर्स फंडचे विश्वस्त, केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री तसंच पीएम केअर फंडाचे नवनियुक्त विश्वस्त सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती के.टी. थॉमस, माजी उपसभापती कारिया मुंडा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा उपस्थित होते. यावेळी फंड सल्लागार मंडळाच्या स्थापनेसाठी तज्ञ व्यक्तींना नामनिर्देशित करण्याचा निर्णय घेतला. भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखापरीक्षक राजीव महर्षी, इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती आणि टीच फॉर इंडियाचे सह-संस्थापक आणि इंडिकॉर्प्स आणि पिरामल फाउंडेशनचे माजी सीईओ आनंद शाह यांना सल्लागार समिती म्हणून निडण्यात आलं.