नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १० लाख बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या महा रोजगार मेळाव्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारच्या विविध विभागात नोकरी मिळालेल्या ७५ हजार बेरोजगारांना आज नियुक्ती पत्र देण्यात आली.
गेल्या आठ वर्षात केंद्र सरकारनं रोजगारनिर्मितीसाठी विविध उपाय योजले आहेत. भारतानं सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं भारतानं प्रयत्न सुरू केले आहेत. विकसित देश होण्याचं उद्दिष्ट सर्वांच्या प्रयत्नानंच साध्य होणार असल्याचं यावेळी युवकांना संबोधित करताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
कौशल्य विकसित करणं, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणं, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना, स्टार्टअपला प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधांच्या विकासातून विविध पातळीवर रोजगारनिर्मिती होत असल्याचं ते म्हणाले. दीड कोटी लोकांना आणि युवकांना विविध कौशल्यांचं प्रशिक्षण देण्यात आलं असून खादी ग्रामोद्योग क्षेत्रात १ कोटी रोजगारनिर्मिती झाली आहे. अवघ्या काही वर्षात ८० हजार स्टार्टअप देशात सुरू झाले असून त्यात लाखो लोकांना रोजगार मिळाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मनरेगामधून ७ कोटी लोकांना काम मिळालं असून ऑगस्टमहिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांची संख्या १७ लाखांनी वाढल्याचं ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयातल्या गट अ, ब आणि क स्तरावर हे युवक रुजू होणार आहेत. निमलष्करी दलं, पोलिस उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, लिपिक, आयकर निरीक्षक आणि इतर पदांवर या युवकांची नियुक्ती झाली आहे.
देशात विविध ठिकाणी एकाचवेळी हा कार्यक्रम घेण्यात आला. मुंबईतल्या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत ३९५ बेरोजगारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. कामाच्या पद्धतींमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध शिफारशी करा आणि अधिकाधिक काम नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन करा असं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं. पुण्यातल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे सहभागी झाले होते. राणे यांच्या हस्ते २०४ तरूण तरूणींना नियुक्तीपत्र देण्यात आली.