नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असून यामध्ये देशातील युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरुकता सप्ताहानिमित्त नवी दिल्लीत काल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
31 ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत ‘भ्रष्टाचारमुक्त भारत विकसित राष्ट्रासाठी’ या संकल्पनेसह दक्षता जनजागृती सप्ताह पाळला जात आहे. त्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकारच्या प्रत्येक विभागानं भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. विकसित राष्ट्र घडवण्यांसाठी विश्वास आणि विश्वासार्हता हे महत्त्वाचे घटक आहेत.असंही पंतप्रधानांनी नमूद केलं. केंद्रीय दक्षता आयोगाच्या नवीन तक्रार व्यवस्थापन प्रणाली पोर्टलचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.