नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या रॅपिड टेस्टिंगच्या ५ लाख किट्स चीनमधून देशात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. मात्र या किट्सचा वापर रुग्णांचे निदान करण्यासाठी केला जाणार नाही केवळ देखरेखीसाठी केला जाणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी हे स्पष्ट केलं आहे. एखाद्या विषाणूने शरीरात प्रवेश केल्यावर त्याच्याशी लढण्यासाठी शरीरातली प्रतिकार शक्ती या अँटीबॉडी तयार करते. रॅपिड टेस्ट किट्समध्ये शरीरातील अँटी बॉड़ी शोधून काढण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्ती, हॉटस्पॉटमध्ये असलेल्या व्यक्ती, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कर्मचारी, ‘सारी’ आजाराने ग्रस्त रुग्ण, इन्फ्लुएन्झाची लक्षण असलेले रुग्ण, परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींसाठीच या किट्स वापरल्या जाणार आहेत. यामधून एखाद्या भागात कोरोना विषाणूचा संसर्गाचा कल कसा आहे हेच जाणून घेतले जाणार असल्याचे ते म्हणाले.
रॅपिड टेस्ट किट्सच्या व्यतिरीक्त नेहमीच्या पद्धतीने देशात दररोज ७८ हजाराहून अधिक चाचण्या करण्याची क्षमता आहे. आतापर्यंत देशात सुमारे २ लाख ९० हजार चाचण्या झाल्याची माहिती गंगाखेडकर यांनी दिली. काल एका दिवसात ३० हजाराहून अधिक चाचण्या झाल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी चाचण्या होत असल्याचा दावा केंद्र सरकारने खोडून काढला आहे. भारतात २४ जणांची चाचणी केल्यानंतर १ रुग्ण आढळतो. जपानमध्ये सुमारे १२, इटलीमध्ये सुमारे ७, अमेरिकेमध्ये सुमारे ५ जणांची चाचणी केल्यावर १ रुग्ण आढळतो, असे त्यांनी स्पष्ट केले. देशात एकूण रुग्णांपैकी सुमारे ३ पूर्णांक ३ दशांश टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १२ टक्के रुग्ण बरे होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
एखाद्या ठिकाणी २८ दिवस कोरोना विषाणू संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही तर त्याठिकाणी कोरोना विषाणू संसर्गाची साखळी मोडण्यात यश आले असे समजले जाते. पुद्दुचेरीतल्या माहे जिल्ह्यात गेल्या २८ दिवसात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. याशिवाय देशातल्या २७ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसात एकही रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. याशिवाय देशातल्या ३२५ जिल्ह्यांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.