नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या साथीमुळे  लागू असलेले निर्बंध लक्षात घेता युपीएससी, अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा आणि मुलाखतींच्या नव्या तारखा  संचारबंदी संपल्यानंतर जाहीर केल्या जाणार आहेत. यासंदर्भात आयोगाच्या वेबसाइटवर माहिती दिली जाईल, असं आयोगानं म्हटलं आहे. आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी वर्षभरासाठी मूळ वेतनात ३० टक्के कपात करण्याचाही निर्णय घेतला आहे.
स्टाफ सिलेक्शन कमीशनतर्फे घेण्यात येणाऱ्या काही परिक्षांच्या तारखांचा निर्णय तीन मे नंतर घेऊन या तारखा मंडळाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येतील. असं मंडळानं कळवलं आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं वेतन प्रधानमंत्री मदत निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान लष्कर भर्तीसाठी बीड जिल्ह्यात होणाऱ्या परीक्षा पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि परीक्षेचा अर्ज भरताना नोंदवलेल्या  आपल्या इमेलवर येणाऱ्या सूचनांकडे  लक्ष ठेवावं, लष्करानं म्हटलं आहे.