नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-२० समूहाचं अध्यक्षपद मिळाल्यामुळे, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्वाच्या मुद्द्यांवर आपला प्रभाव टाकून मोठं योगदान देण्याची भारताला संधी आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज दृकश्राव्य सहभागाद्वारे जी-२० समूह संमेलनाचं बोधचिन्ह, विषय आणि संकेतस्थळ यांचं अनावरण केलं. येत्या एक डिसेंबर पासून जी-२० समूहाचं अध्यक्षपद भारताला मिळणार आहे. भारत सर्व जगाच्या उज्वल भविष्यासाठी काम करत आहे. कोरोना नंतरचा काळ विविध संकटांचा, संघर्षाचा आणि आर्थिक अनिश्चिततेचा असून जी-२० समूहाकडून लोकांना आशा आहे, असंही मोदी म्हणाले. आज जारी केलेल्या बोधचिन्हाची मोदी यांनी माहिती दिली. या बोधचिन्हात भारतीय संस्कृती, परंपरा आणि विश्वासाचं प्रतीक असलेलं कमळ असून ते जगाला एकजूट राहण्याचा संदेश देत आहे. या कमळाच्या सात पाकळ्या जगातले सात खंड तसंच संगीताच्या सात सुरांचं प्रतीक आहे, असं सांगून मोदी यांनी, जी-20 मध्ये भारत ‘एक पृथ्वी, एक परिवार, एक भवितव्य’ या मंत्राद्वारे विश्व कल्याणाचा मार्ग प्रशस्त करेल, असा विश्वास व्यक्त केला.