नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यात सुरू असलेल्या ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमध्ये दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांगजनांसाठीच्या विशेष विभागात उपशीर्षक आणि चित्रपटातल्या दृश्य माहितीच्या श्राव्य वर्णनासह गांधी आणि द स्टोरीटेलर हे दोन चित्रपट दाखवले जाणार आहेत. तसंच दिव्यांग व्यक्तींच्या आवश्यकता लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
याशिवाय, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात FTII नं विशेष दिव्यांग व्यक्तींसाठी स्मार्टफोन फिल्म मेकिंगचा एक मूलभूत अभ्यासक्रम आणि व्हीलचेअरवरील दिव्यांगांसाठी अभिनयाचा मूलभूत कोर्स असे दोन विनामूल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत.यंदाच्या इफ्फीमध्ये दिव्यांगजनांसाठी महोत्सवाचे ठिकाण आणि चित्रपट प्रदर्शित होणारी इतर ठिकाणे अधिकाधिक सुकर करण्यात आली आहेत. रॅम्प, हँडरेल्स आणि ब्रेल लिपीमधील दिशादर्शक फलकांची सुविधा देण्यात आली आहे.