नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येमेनमधल्या युद्धात गेल्या आठ वर्षांत ११ हजारापेक्षा जास्त लहान मुलं मृत्युमुखी पडल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. या युद्धात हजारो मुलांनी आपले प्राण गमावले आहेत आणि तेवढीच मुलं विविध प्रकारच्या आजारांना आणि उपासमारीला बळी पडली आहेत असं युनिसेफच्या कार्यकारी संचालक कॅथरीन रुसेल यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

या युद्धात २० लाखापेक्षा जास्त लहान मुलांची उपासमार झाली असून मार्च २०१५ ते सप्टेंबर २०२२ या काळात ३ हजार ७७४ मुलांचा मृत्यू झाल्याचं यात म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर तात्काळ युद्धविराम लागू करणं हे सकारात्मक पाऊल असेल असं कॅथरीन रुसेल यांनी म्हटलं आहे. येमेन संकटाच्या पार्श्वभूमीवर मानवतावादी सहाय्या अंतर्गत कामांसाठी ४८ कोटी ४४ लाख डॉलर्सचा निधी गोळा करण्याचं आवाहन युनिसेफनं केलं आहे.