नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी, जल जीवन अभियान हा राज्याच्या विकासाचा महत्त्वाचा मापदंड असल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मध्यप्रदेशात भोपाळ इथं पहिल्या दोन दिवसीय अखिल भारतीय जल परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित करत होते. नागरिकांनी जलसंधारणाशी संबंधित मोहिमांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. पाणी बचतीसाठी केंद्र सरकारनं अटल भूजल संरक्षण योजना सुरु केली असून, या योजनेला आणखी व्यापक करण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले.
जलशक्ती मंत्रालयातर्फे आयोजित या परिषदेची संकल्पना “वॉटर व्हिजन@2047” अशी आहे. राज्यांकडून विविध समाजगटांकडून पाण्याबद्दल माहिती गोळा करणं, हे या दोन दिवसीय परिषदेचं प्राथमिक उद्दिष्ट आहे.