नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्यदिन आज सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. “माहिती: एक सार्वजनिक हिताची गोष्ट” अशी यंदाची संकल्पना आहे. सर्व राष्ट्रांच्या सरकारांनी वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य, आत्मनिर्भरता आणि त्यांची वेगळी ओळख जपण्याकरता आपली ताकद वापरावी असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंटोनियो गुटेरस यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात केलं आहे.
अनेक देशांमधे पत्रकारांना निर्बंध, छळ, बंदिवास किंवा कधी कधी मृत्यूला सामोरं जावं लागतं असं गुटेरस यांनी नमूद केलंय.उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाच्या माध्यमांना शुभेच्छा दिल्या आहेत. माध्यमांनी वस्तुनिष्ठता, अचूकता, निष्पक्षता आणि चांगुलपणासारख्या पत्रकारीतेच्या सिद्धांतासाठी कटीबद्ध राहावं, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे.