नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संयुक्त राष्ट्रसंघानं 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केलं आहे. त्या अनुषंगानं कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. मकर संक्रांत-भोगी हा दिवस राज्यामध्ये “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून मोठ्या उत्साहानं साजरा करावा, असं आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आलं आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत पौष्टिक तृणधान्य पिकांचं आहारातील महत्व, त्याचे लाभ पोहोचावेत तसचं तृणधान्य पिकांचं क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता वाढ यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.

या दिनाचं औचित्य साधून प्रत्येक कृषि सहाय्यक गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचं आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचं लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देण्यासाठी प्रगतीशील शेतकरी, आहार तज्ज्ञ,विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रमांचं आयोजन करणार असल्याचं कृषि विभागाकडून कळविण्यात आलं आहे.