पिंपरी : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार होत असल्याचे या माहिती अधिकारातील माहितीवरून समोर आले आहे. बॅच, बिल्ला मिळण्यासाठी अपुरे कागदपत्रे, बोगस रहिवाशी दाखले, ज्या दिवशी संबंधित अधिकारी रजेवर आहे. त्याच दिवशी त्यांच्या सहीने दाखले वितरित केले असल्याचे या माहितीतून उघड झाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फिटनेस प्रमाणपत्राच्या वाहन चाचणीचे व्हिडिओ चित्रीकरण करणे बंधनकारक असताना त्याचे कुठलेही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचेही दिसून आले आहे.

या सर्व प्रकाराची चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेच्या पिंपरी विधासभेच्या युवती सेनाधिकारी प्रतीक्षा घुले, पिंपरी विधानसभेचे विभाग संघटक नीलेश हाके, अँँड. अजित बोराडे, सनी कड, ओंकार जगदाळे, राहुल राठोड यांच्यावतीने करण्यात आली आहे.