नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशातील भारतीय समुदायाची समूह शक्ती आणि क्षमता भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे.इंदूरमध्ये आयोजित सतराव्या प्रवासी भारतीय दिन संमेलनाच्या समारोप सत्रात त्या काल बोलत होत्या.
परदेशी भारतीय कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं.या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते 27 जणांना प्रवासी भारतीय दिन सन्मान प्रदान करण्यात आले.शिक्षण, कला, संस्कृती, व्यवसाय आणि सामाजिक कार्यात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हा सन्मान करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यावेळी उपस्थित होते.