नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतली प्रख्यात सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत निघाली असून २००८ पासून अमेरिकेतल्या वित्तीय संस्थांच्या बुडीत प्रकरणातली ही दुसरी मोठी घटना आहे. मुख्यत्वे तंत्रज्ञान केंद्रित प्रकल्प आणि भांडवल पुरवणाऱ्या कंपन्यांना ही बँक वित्तपुरवठा करत असे.  या बँकेत गुंतवणूकदार आणि अनेक कंपन्यांचे लाखो डॉलर्स अडकले आहेत. बँक अचानक बंद झाल्यानं जागतिक बाजारपेठांमध्ये गोंधळाचं आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. आर्थिक मंदी तसंच तंत्रज्ञान आणि  क्रिप्टो स्टार्टअप्स मध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाल्यानं बँकेच्या व्यवहारांवर  विपरीत परिणाम झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दरम्यान बँकेच्या ग्राहकांची रक्कम सुरक्षित असल्याचं बँक बुडीत निघण्याच्या एक दिवस आधी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग बेक यांनी जाहीर केलं होतं. सिलिकॉन व्हॅली बँकेत  २०९ अब्ज डॉलर ची मालमत्ता आणि १७५ अब्ज डॉलर इतकी ठेव रक्कम आहे.