नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल मलेशियाची राजधानी कुआलालाम्पूर इथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या प्रादेशिक कार्यालयाचं उद्घाटन केलं. हे प्रादेशिक कार्यालय भारत आणि मलेशिया यांच्यातील औद्योगिक सहकार्याला चालना देईल आणि आग्नेय आशिया क्षेत्रात एच ए एल चं केंद्र म्हणून काम करेल. आपल्या मलेशिया दौर्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी राजनाथ सिंह यांनी कुआलालाम्पूर येथील भारतीय जनसमुदायाशी संवाद साधला.
भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या ब्रीदाला अनुसरून सगळ्यांच्या कल्याणासाठी काम करण्याचं त्यांनी यावेळी आवाहन केलं. मलेशियात भारतीय वंशाच्या लोकांची संख्या लक्षणीय असून, हे जणू त्यांचं दुसरं घरच आहे अशा भावना सिंह यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या. अन्य एका कार्यक्रमात भारतीय वंशाच्या वेगवेगळ्या समुदायांच्या प्रतीनिधांची त्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.