मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात सुरु असलेल्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस सेवेला बसला आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यात एसटी महामंडळाचं गेल्या चार दिवसांमध्ये जवळजवळ सव्वा दोन कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

एसटी सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी बीड जिल्ह्यात आज सुरक्षा दलांनी शहराच्या प्रमुख रस्त्यांवर रूट मार्च काढला होता. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.