मुंबई (वृत्तसंस्था) : शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानाने आयोजित केलेल्‍या श्रीरामनवमी उत्‍सवाला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली.  उत्सवाच्या पहिल्या दिवशी काकड आरती, पाद्यपूजा, साईबाबांच्या प्रतिमेची मिरवणूक, पारायण आणि विविध धार्मिक कार्यक्रम झाले. उद्या श्रीरामनवमीच्या निमित्तानं श्रीरामजन्‍म किर्तन, नृत्‍योत्‍सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

पहाटे श्रींची काकड आरती, अखंड पारायणाची समाप्‍ती होवून श्रींच्‍या फोटो आणि पोथीची मिरवणूक होईल. त्यानंतर  कावडींची मिरवणूक आणि  श्रींचे मंगलस्‍नान होईल. सकाळी दहा ते बारा यावेळेत श्रीरामजन्‍म किर्तन कार्यक्रम, दुपारी साडे  बारा वाजता माध्‍यान्‍ह आरती, चार वाजता निशाणांची मिरवणूक आणि श्रींच्‍या रथाची गावातून मिरवणूक होणार आहे.

मिरवणूक परत आल्‍यानंतर संध्याकाळी धुपारती तसंच साई स्‍वर नृत्‍योत्‍सव हा कार्यक्रम होणार आहे. उद्या रात्री दहा ते परवा पहाटे पाच  वाजेपर्यंत श्रींच्या समोर इच्‍छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. हा उत्‍सवाचा मुख्‍य दिवस असल्‍यानं समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहील.

श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी राज्‍यातून पालख्‍यांसोबत आलेल्‍या पदयात्री साईभक्‍तांच्‍या श्रीसाईनामाच्‍या गजराने अवघी शिर्डी दुमदुमुन गेली आहे.