नवी मुंबई : ज्यांच्या सत्तेच्या काळात बेरोजगारी वाढली, शेतकरी आत्महत्या वाढल्या त्या सरकारकडे जायचे कशाला? सत्तेसाठी तिकडे जाणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असा शब्दात भाजपवासी झालेल्या नेत्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाचार घेतला. पक्षातील अनेक नेते पक्षांतर करत असताना त्याविषयी भाष्य न करणाऱ्या पवार यांनी नवी मुंबईतील मेळाव्यात आपले मौन सोडून पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर शरसंधान केले.

नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रविवारी झालेल्या जिल्हा मेळाव्यात श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले, विकास कामांसाठी आम्ही पक्षांतर केले असे काही जण सांगतात. पण, प्रत्यक्षात विरोधी पक्षात बसून जास्त कामे करून घेता येतात. याचा अनुभव मी घेतला आहे. त्यासाठी अभ्यास असण्याची गरज असते. त्यांनी गणेश नाईक यांचे नाव न घेता त्यांच्यावरही टीका केली. पक्षाने कितीही दिले तरी सत्तेशिवाय जे राहू शकत नाहीत, त्यांन पक्षांतर केले, असे ते म्हणाले.

महागाई आणि बेरोजगारीसारख्या प्रश्नांनी देशात डोके वर काढले आहे. त्यावर तोडगा काढण्यात केंद्रातील आणि राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढल्या आहेत. नोकऱ्या निर्माण करण्याऐवजी या सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली आहे. मग त्यांच्याकडे कशासाठी जायचं, असा सवाल त्यांनी केला.