नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये सध्या पसरत असलेल्या श्वसन आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आरोग्यासंदर्भात तयारीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधील उत्तर भागात लहान मुलांमध्ये श्वासन संस्थेसंबंधित आजारांच्या साथी पसरत आहेत. या परिस्थितीवर केंद्रिय आरोग्य मंत्रालय बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि सध्यातरी भारतात कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
सावधगिरीचा उपाय म्हणून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ‘कोविड प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या सुधारित नियमांची आणि मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी, लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये होणारे गंभीर श्वसन आजार, इन्फ्लूएंझामुळे होणारे आजार आणि संबंधित रुग्णांचं बारकाईने निरीक्षण करण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत.