नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन बाहेर सहा हजारांहून अधिक जणांना कोविड१९ या आजाराची लागण झाली असून, जगभरात या आजाराचा संसर्ग झालेल्यांची संख्या ८५ हजार ४०० हून अधिक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे.

या आजारामुळे आतापर्यंत चीन बाहेरचे ८६ रुग्ण दगावले असून, त्यातले १९ जण गेल्या चोवीस तासांमध्ये दगावले असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे.

गेल्या २४ तासात या आजाराची लागण झालेले तेराशे नवे रुग्ण आढळून आले आहेत, त्यात मेक्सिको आणि सॅन मारिना या देशांमध्ये आढळलेल्या पहिल्या रुग्णांचाही समावेश असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. आतापर्यंत चीन शिवाय इतर ५३ देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.