नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानकडून दहशतवादाच्या रूपात सुरु असलेल्या छुप्या युद्धाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३७ व्या तुकडीचं दीक्षांत संचलन झालं, यावेळी राजनाथ सिंह उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानवर टीका केली. जागतिक मंचावर दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा चेहरा उघड झाल्यावर पाकिस्तान एकटा पडला आहे, असं त्यांनी सांगितलं. सशस्त्र सेना देशाची ताकद असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सशस्त्र सेनेचं योगदान महत्वाचं आहे, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
यावेळी राष्ट्रीय प्रबोधिनीच्या छात्रांनी प्रभावी संचलन केलं. सुखोई लढाऊ विमानं आणि सारंग हेलिकॉप्टर्सच्या हवाई संचलनाने या सोहळ्याचा समारोप झाला.