पुणे :  दिनांक 07 नोव्हेंबर 2019 ते 07 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये बाल कामगार प्रथा विरूद्ध जनजागृती करण्याचे दृष्टीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 28 नोव्हेंबर 2019 रोजी बाल कामगाराशी निगडीत काम करणा-या स्वंयसेवी संस्था, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या सहकार्याने अत्यल्प उत्पन्न असलेल्या पालकांचे प्रबोधन करण्याकरीता तसेच बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती करण्याकरीता पुणे कामगार उप आयुक्त, विकास पनवेलकर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील – भोर, इंदापूर, हवेली, दौंड, बारामती या तालुक्यांच्या ठिकाणी पथकांची नेमणूक करण्यात आली होती.

या पथकाव्दारे नेमून देण्यात आलेल्या तालुक्यामध्ये आशा सेविका  व अंगणवाडी सेविका- श्रीमती कविता अलगुडे, भोर तालुका, श्रीमती अनिशा सय्यद् व श्रीमती रुपाली पांढरे, इंदापूर तालुका, श्रीमती लक्ष्मी क-हे, बारामती तालुका यांनी कामगार उप आयुक्त कार्यालयातील सुविधाकार यांचे समवेत अत्यल्प उत्पन्न असलेल्या पालकांच्या बैठका घेवून बाल कामगार प्रथेविरुध्द् जनजागृती मोहिम राबविली व बाल कामगार या अनिष्ट् प्रथेचे उच्चाटन करणेबाबत माहिती देवून प्रबोधन करण्यात आले.

उपस्थित सर्व पालकांनी आपल्या बालकांना कामावर न पाठविता त्यांना शाळेत पाठविणेबाबत आवाहन कामगार उप आयुक्त कार्यालयाच्यावतीने  करण्यात आले. तसेच बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती करण्याकरीता तालुक्याच्या  ठिकाणी रॅली आयोजित करण्यात आली होती व प्रमुख बाजारपेठामध्ये बालकामगार कामावर न ठेवण्याबाबतचे स्टीकर लावण्यात येवून बाल कामगार न ठेवणेबाबतची जागृती करण्यात आली. तसेच विविध आस्थापना मालकांकडून बालकामगार कामावर न ठेवणेबाबतची हमीपत्रे भरुन घेण्यात आली.  जनजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून बालकामगार कामावर न ठेवणेबाबतचे आवाहन करणारे फिरते वाहनाव्दारे तालुक्याच्या ठिकाणी प्रबोधन करण्यात आले.

दि.29 व 30 नोव्हेंबर 2019 रोजी पुणे शहारातील अमनोरा मॉल- हडपसर, फिनिक्स मार्केट सिटी – नगर रोड, रिलायन्स रिटेल- औंध, वेस्टएनड मॉल- औंध या मॉलमध्ये सेल्फी कटआऊट् लावण्यात आले असून तेथे येणा-या ग्राहकांना बाल कामगार या अनिष्ट् प्रथेविरुध्द् माहिती देण्यात येवून बाल कामगार कामावर न ठेवणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. तसेच कामगार उप आयुक्त यांचे कार्यालयात देखील  सेल्फी  कटआऊट् लावण्यात आले असून, तेथे येणा-या अभ्यागतांना बाल कामगार या अनिष्ट प्रथेविरुध्द माहिती देण्यात येवून बाल कामगार कामावर न ठेवणेबाबतचेही आवाहन करण्यात आले आहे.