बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि पं. दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास अभियान यांच्यावतीने आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला बीड जिल्ह्यातील गोपीनाथगड, परळी येथे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्रातील मंत्री पंकजा मुंडे, श्री महादेव जानकर, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि अन्य नेते यावेळी उपस्थित होते.
नव्याने निवडून आलेल्या खासदारांचा यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, जय सिद्धेश्वर स्वामी, डॉ. सुजय विखे पाटील, रणजित नाईक निंबाळकर, सुधाकर श्रृंगारे, संजय जाधव, हेमंत पाटील, प्रताप पाटील चिखलीकर यांचा समावेश होता.
स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करते आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणे, या भागात रेल्वे आणणे आणि प्रत्येक शेवटच्या माणसासाठी लोककल्याणाच्या योजना आणणे, यावर राज्य सरकारचा भर आहे. मराठवाड्याच्या हक्काचे 7 टीएमसी पाणी गोदावरी खोर्यात आणून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला ते देण्याच्या योजनेवर काम केले जात आहे.
मराठवाडा वॉटरग्रीडच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पालाही गती देण्यात आली आहे. धरणांना जोडून बंद पाईपलाईनमधून सिंचन पुरविण्यावर राज्य सरकारचा भर आहे. अहमदनगर-परळी-बीड रेल्वेमार्गाचेही काम गतीने होते आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार कठोर परिश्रम करते आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मदत करण्यासाठी 4700 कोटी रूपये देण्यात आले आहेत. 1300 कोटी रूपये पीकविम्याचे आतापर्यंत देण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम सुद्धा वितरित करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले.