मुंबई : भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव मौजे नायगाव (तालुका खंडाळा, जिल्हा सातारा) या ऐतिहासिक स्थळास आता ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला असल्याची माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.
भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती घेण्यासाठी त्यांचे जन्मगाव असलेल्या मौजे नायगाव या ठिकाणास विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक सहली वर्षभर भेट देत असतात. या ठिकाणास दरवर्षी ५ लाखापेक्षा अधिक पर्यटक भेट देतात. ही पार्श्वभूमी विचारात घेवून यापूर्वी ‘क’ वर्गात असणाऱ्या या पर्यटनस्थळास आता ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.
सन २००४ मध्ये शासनातर्फे मौजे नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचे राज्य संरक्षित राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील निवडक प्रसंगांची उठावदार शिल्पे असणारी शिल्पसृष्टी उभारण्यात आली आहे. तसेच त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच ०३ जानेवारी रोजी या ठिकाणी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
आता या स्थळास ब वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्याने या ऐतिहासिक स्थळाच्या विकासाला अधिक प्रमाणात चालना मिळेल. तसेच त्या माध्यमातून सावित्रीबाईंचे कार्य आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्थळास अधिकाधिक पर्यटकांनी भेट द्यावी, असे आवाहन मंत्री श्री. रावल यांनी केले आहे.