नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलाला तोंड देण्याच्या उद्देशानं वनीकरण मोहीम तीव्र करण्यासाठी केंद्रानं राज्यांना सात अब्ज डॉलरचा निधी दिला असल्याचं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे.
ते आज नवी दिल्लीत ‘जागतिक शाश्वत विकास परिषद-2020’ मध्ये बोलत होते. गेल्या चार वर्षात 13 हजार चौरस किलोमीटर क्षेत्र वनाच्छादित करणारा भारत हा जगातला एकमेव देश आहे, असं ते म्हणाले.
लोकसंख्या सातत्यानं वाढत असताना, लोकांनी शाश्वत वापरावर भर देण्याची आणि त्यांच्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे, असं त्यांनी नमूद केलं. हवामान बदलाला तोंड देण्यासाठी नवोन्मेषकारक तंत्रज्ञान उपयोगी ठरेल. त्यासाठी आणखी जास्त संशोधन आणि विविध देशांमधल्या सहकार्यावर त्यांनी भर दिला.