नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये युवा भारत एक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. देशाची अर्थव्यवस्था एका नव्या उंचीवर नेण्यावर आणि स्वयंपूर्ण, सक्षम, समृद्ध आणि सुरक्षित भारताची निर्मिती करण्यावर त्यांनी भर दिला.
ते काल एन सी सी-2020,या प्रधानमंत्र्यांच्या वार्षिक मेळाव्यामध्ये बोलत होते. सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात त्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
शेजारच्या देशांमधल्या धार्मिक अल्पसंख्याकांचा छळ संपवण्याच्या भाजपानंदिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आणि इतिहासात घडलेल्या अन्यायाचं परिमार्जनकरण्यासाठी, केंद्र सरकारनं हा कायदा आणला आहे असं त्यांनी सांगितलं.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून जम्मू-काश्मीरची समस्या कायम होती आणि दहशतवादही फोफावला होता. मात्र, आता भारत आता एका युवा दृष्टीकोनासह आगेकूच करत आहे आणि दहशतवादाच्या उच्चाटनासाठी सर्जिकल स्ट्राईक आणि एयर स्ट्राईक सारख्या कारवाया केल्या जात आहेत, असं त्यांनी सांगितलं.
ईशान्येकडच्या राज्यातल्या जनतेकडे अनेक दशकांपासून दुर्लक्ष केलं जात होतं, मात्र आता आपल्या सरकारनं त्यांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी पावलं उचलली आहेत, असं ते म्हणाले.