मुंबई : राज्यातील दूध आणि दूध भुकटी निर्यात करण्यासाठी सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली, असे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
मंत्रालयात आयोजित सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. या बैठकीत सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार दिपक साळुंके, यशवंत माने उपस्थित होते.
श्री. केदार म्हणाले, राज्यातील मोठ्या प्रमाणात दूध उत्पादनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना खरेदी दरात योग्य अशी वाढ देण्याबाबत जुलै 2018 रोजी शासनाने निर्णय घेतला होता. यामध्ये दूध भुकटी व दुधाची निर्यात करण्यासाठी सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना 50 आणि 5 रुपये प्रति लिटर प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली होती.
ही योजना ऑगस्ट ते ऑक्टोबर 2018 पर्यंत राबविण्यात आली. त्यानंतर 8 मार्च 2019 पर्यंत योजनेस मुदतवाढ देताना 5 रुपये अनुदानाचे 3 रुपये करण्यात आले. यामध्ये लाभार्थ्यांचे अनुदान शासनाकडे प्रलंबित आहे. हे अनुदान देण्याकरिता अधिकाऱ्यांना संबंधित अहवाल सादर करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या असल्याचे यावेळी सांगितले.