पावसाळ्यातील साथरोगांवरील उपाययोजनांचा आढावा
मुंबई : पावसाळा तोंडावर आल्याचे लक्षात घेता येणाऱ्या काळात कोरोनाशिवाय इतर साथरोग देखील वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्यावतीने सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा शुक्रवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला. हिवतापासाठी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये कीटकनाशक फवारणी आणि पाणी गुणवत्तेसाठी राज्यात स्वच्छता सर्वेक्षणाला गती देण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.
या काळात रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कोरोनासाठी निर्माण करण्यात आलेल्या तीन स्तरावरील रुग्णालयीन व्यवस्थेत आवश्यकतेनुसार खाटांची क्षमता वाढविण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले.
पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूला आळा घालण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात किटकनाशक फवारणीचे काम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत त्यासाठी स्वच्छता सर्वेक्षणाचे काम हाती घ्यावे.
प्रत्येक ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेनुसार हिरवे, पिवळे आणि लाल रंगाचे कार्ड दिले जाते. त्या अनुषंगाने लाल आणि पिवळ्या रंगाचे कार्ड असलेल्या ग्रामपंचायतींनी आपल्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत असलेल्या विहीरींमध्ये ब्लिचींग पावडरचा वापर करून ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.