कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी विभागीय आयुक्तांना ३९.५६ कोटींचा निधी
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पसरलेल्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना वेगवेगळ्या शासन निर्णयानुसार आतापर्यंत १७१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. पुन्हा आता विभागीय आयुक्तांमार्फत १६ जिल्ह्यांना ३९ कोटी ५६ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता फैलाव लक्षात घेता मदत व पुनर्वसन , आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे येणाऱ्या निधीसंदर्भात कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली. मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक, अभय यावलकर यांच्याशी चर्चा केली व त्यानुसार प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले. या प्रस्तावाच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तातडीने विभागीय आयुक्तांच्या मार्फत जिल्ह्यांना निधी वितरित करण्याचे निर्देश सचिवांना दिले. त्यानुसार विभागीय आयुक्तांमार्फत राज्यातील सोळा जिल्ह्यांना ३९ कोटी ५६ लाख रुपये इतका निधी दिनांक २९ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार वितरित करण्यात आला असल्याची माहिती मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी दिली
विभागवार माहिती देताना श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले की, नागपूर विभागासाठी २८ कोटी रुपये निधी देण्यात आले असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यासाठी ५ कोटी, गडचिरोली जिल्ह्यासाठी ४ कोटी , नागपूर जिल्ह्यासाठी १५ कोटी , वर्धा जिल्ह्यासाठी २ कोटी, गोंदिया जिल्ह्यासाठी १ कोटी तसेच अमरावती विभागासाठी २ कोटी ८६ लाख रुपये निधी देण्यात आले असून त्यात अमरावती जिल्ह्यासाठी १ कोटी ५० लाख , अकोला जिल्ह्यासाठी ४० लाख, यवतमाळ जिल्ह्यासाठी ४६ लाख, बुलडाणा जिल्ह्यासाठी ३० लाख, वाशीम जिल्ह्यासाठी २० लाख आणि नाशिक विभागासाठी ८ कोटी ७० लाख रुपये निधी देण्यात आले असून त्यात नाशिक जिल्ह्यासाठी ५ कोटी, धुळे जिल्ह्यासाठी २ कोटी २० लाख , जळगाव जिल्ह्यासाठी १ कोटी, अहमदनगर जिल्ह्यासाठी २५ लाख , नंदुरबार जिल्ह्यासाठी २५ लाख रुपये निधी वितरीत करण्यात आलेला आहे.
या निधीमधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे, वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च तपासणी/छाननीसाठी सहाय्य, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, शासनाच्या अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व आवश्यक वस्तू, अग्निशमन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च व व्हेंटीलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. यापूर्वी १७१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी दिली
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता सर्वांनीच एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे, कार्पोरेट क्षेत्रातील मान्यवर नेहमीच राज्यातील अनेक संकटाच्या वेळी मदतीसाठी पुढे आले आहेत. यावेळीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी मंत्रालय आणि शासकीय कार्यालय, बसेस, एसटी बसेस या शासकीय आणि खाजगी परिवहनचे निर्जंतुकीकरण करणे, टेस्टिंग किट उपलब्ध करून देणे, प्रयोगशाळांची संख्या वाढवणे या अनुषंगाने कॉर्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीत (CSR) व इतर माध्यमातून मदत करण्याचे आवाहन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी केले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन देत राज्यातील जनतेने काळजी घ्यावी व सतर्क राहावे, असे आवाहन श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.