मुंबई : मुंबईत अनेक क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध कलाकार येत असतात. या कलाकारांना भेटण्यासाठी, समन्वयासाठी ‘सांस्कृतिक केंद्र’ तयार करण्याचे नियोजन करण्यात यावे अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.

सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध संचालनालयाचा आढावा सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख यांनी मंत्रालयात घेतला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबईत कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी येणाऱ्या कलाकारांना भेटण्यासाठी, स्वत:ची कला सादर करण्यासाठी, समन्वयासाठी एक हक्काची जागा असणे आवश्यक आहे. अशा सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून कलाकारांना संपर्क करणे सोपे होणार असल्याने हे केंद्र कुठे करता येईल याबाबत अभ्यास करावा अशा सूचना श्री. देशमुख यांनी विभागाला केल्या.

राज्यातील गड- किल्ल्यांचे जतन व संवर्धन पुरातत्व संचालनालयामार्फत करण्यात येते. येणाऱ्या वर्षात अधिकाधिक गड- किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात यावी. राज्यातील गड- किल्ल्यांचे संवर्धन करताना ‘औसा’ किल्ल्याचा इतिहास आणि संदर्भ लक्षात घेऊन औसा किल्ल्याचे संवर्धन विशेष प्रकल्पाअंतर्गत करण्यात यावे असेही श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.  जिल्हा कला अकादमी, महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा,  राज्यातील नाट्यगृहांचे काम वेळेत पूर्ण करणे आणि कलाकारांना देण्यात येणारे मासिक मानधन यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात यावी असे निर्देशही श्री. देशमुख यांनी यावेळी दिले.