नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६\११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातला लष्करे-तोयबा या दहशतवादी संघटनेचा, पाकिस्तानस्थित सदस्य साजित मीर याला, ‘जागतिक पातळीवरचा दहशतवादी’ म्हणून घोषित करावा, या भारत आणि अमेरिकेनं मांडलेल्या प्रस्तावाला चीननं विरोध केला आहे. मीरची जागतिक पातळीवर दहशतवादी म्हणून नोंद करावी, त्याची मालमत्ता गोठ्वावी, शस्त्रबंदीसह त्याच्यावर प्रवासबंदी घालावी अशी मागणी करणारा प्रस्ताव अमेरिकेनं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे काल सादर केला होता, त्याचं भारतानं समर्थन केलं होतं. त्यावर चीननं ही विरोधी भूमिका घेतली आहे.
मीर हा मुंबईवर झालेल्या ह्ल्ल्यातला प्रमुख आरोपी असून ‘मोस्ट वॉन्टेड’ म्हणून त्याच्या वर पाच दशलक्ष डॉलर्सचं बक्षिस अमेरिकेनं जाहीर केलं आहे. मीर याला दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयानं पंधरा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, परंतु त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी सूत्रांनी दिली आहे. यापार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी त्याच्या मृत्यूचा पुरावा पाकिस्तानकडे मागितला आहे. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा आराखडा तयार करणं, त्यासाठी शस्त्रं पुरवणं आणि प्रत्यक्ष हल्ल्याची अंमलबजावणी करणं आदी साजित मीर याच्यावर गुन्हे दाखल आहेत.