पिंपरी : सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयात कॅन्सर, हृदयरोग तसेच रक्तवाहिन्यांसंबंधी गंभीर आजारांवरील उपचारांसाठी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरु करण्यात यावे, अशी मागणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच फास्ट फूड व उघड्यावरील बनविलेल्या पदार्थांचे अतिरिक्त सेवन तसेच वातावरणातील होणारे बदल, दुषित पाणी यांमुळे नागरिकांमध्ये कॅन्सर, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जीवघेणे आजार झपाट्याने वाढत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये असलेल्या औंध जिल्हा रुग्णालयामध्ये अशा मोठ्या गंभीर आजारावरील शस्त्रक्रिया व त्यावरील उपचार याची कमतरता आढळून येते.
कॅन्सर, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जीवघेणे आजार झालेल्या रुग्णांना उपचारांसाठी दरवर्षी पाच ते सात लाखापर्यंत खर्च करावा लागत आहे. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना महागड्या खाजगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे. सामान्य नागरिकांना हा खर्च परवडणारा नाही.
सांगवीतील औंध जिल्हा रूग्णालयातील उपलब्ध असलेल्या भौतिक व पायाभूत सुविधा पाहता याठिकाणी कॅन्सर, मेंदूवरील आजार, हृदयाच्या आजारांवरील सर्व प्रकारच्या तपासण्या, शस्त्रक्रिया व उपचार यासाठी स्पेशालिस्ट विभाग, आयसीसीयू उभा करणे शक्य आहे. त्यामुळे या रुग्णालयात ही सुविधा उभी करून त्याद्वारे नागरिकांना माफक दरात उपचाराची कार्यवाही करण्यासाठी आरोग्य विभागाच्या संबंधितांना तत्काळ आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.”