नवी दिल्ली : चांद्रयान-2 मोहिमेसह इस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमांबाबत माहिती देण्यासाठी केंद्रीय ईशान्य राज्य विकास, पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांच्याबरोबर पत्रकार परिषद घेतली.

यावेळी डॉ. सिंग यांनी वैज्ञानिक समुदायाच्या मेहनतीची प्रशंसा केली आणि सामान्य माणसाचे जीवनमान सुधारण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाच्या वापराचा लाभ अधोरेखित केला. चंद्रावर पाणी आहे हे सिद्ध करण्यास चांद्रयान-1  महत्त्वाचे होते, असे ते म्हणाले. आगामी गगनयान अभियानाबाबत सिंग म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतील तेव्हा 2022 मध्ये भारत पहिले मानवी अंतराळ यान पाठवेल. या अभियानासाठी सरकारने 10 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.

इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी चांद्रयान-2 मोहिमेसह गगनयान आणि अन्य मोहिमांची माहिती दिली. 2023 मध्ये शुक्र ग्रहावर एक मोहिम राबवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. तसेच स्वत:चे अवकाश स्थानक उभारण्यासाठी इस्रो प्रयत्नशील असल्याचे सिवन म्हणाले. यावेळी अंतराळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.