नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरच्या लाल चौक भागात गेल्या रविवारी झालेल्या हातबॉम्ब हल्ल्याच्या संदर्भात पोलिसांनी काश्मीर खोऱ्यातून तिघा संशयितांना अटक केली आहे.

हे तिघे जण जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा संशय आहे अशी माहिती, श्रीनगर चे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हसीब मुघल यांनी वार्ताहरांना दिली.

सर्वसामान्य जनतेमध्ये घबराट पसरवून दैनंदिन व्यवहार विस्कळीत करण्याचा हेतू या हल्ल्यामागे होता असंही त्यांनी सांगितलं.

या हल्ल्यात सी आर पी एफ या केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान आणि चार नागरिक जखमी झाले होते.