पुणे : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे व कृषी विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत सेंद्रिय धान्य महोत्सवाचे उद्घाटन दिनांक ६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता पार पडले. परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत पहिला व दुसरा टप्पा असे मिळून एकूण ४२ शेतकरी गटांनी सेंद्रिय धान्य महोत्सवामध्ये सहभाग घेतला आहे. महोत्सवामध्ये एकूण ३० स्टाल मध्ये सेंद्रिय अन्नधान्याची विक्री शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत होत आहे.
या अन्नधान्यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय तांदूळ (इंद्रायणी, आंबेमोहोर, फुले समृद्धी, कोलम, रायभोग), गहू, खपली गहू, कडधान्य, दली, सेंद्रिय गुळ व काकवी, कांदा, हळद, प्रक्रिया केलेले पदार्थ तसेच सेंद्रिय फळे व भाजीपाला इत्यादींचा समावेश आहे. महोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसात अनुक्रमे १६ टन व १९ टन असे मिळुन ३५ टन शेतमालाची विक्री शेतकर्यांनी केली आहे.
महोत्सवात उपलब्ध असलेला शेतमाल हा सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला असून त्यासाठी संद्रीय शेती मुलतत्वांचे व अंतरराष्ट्रीय नियमावलीचे पालन केले आहे. सेंद्रिय निविष्ठांचा वापर केल्याने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादन त्यांना प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशके, कृत्रिम पदार्थांचा वापर पूर्णपणे टाळला आहे व उत्पादित शेतमाल हा लबोरेटरी टेस्टेड असल्यामुळे रसायनमुक्त असल्याची शाश्वती आहे. परिणामस्वरूप हा शेतमाल अतिशय उत्कृष्ट, सकस व आरोग्यवर्धक आहे. निश्चितच बाजारामध्ये व्यापार्यांकडे उपलब्ध असणाऱ्या सेंद्रिय शेतमालापेक्षा रास्त दरात मिळण्याची हमी याद्वारे मिळत आहे.
सदर धान्यमहोत्सवाचा कालावधी दिनांक ६ ते ८ फेब्रुवारी २०२० सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत कृषी भवनाच्या मागील बाजूस, शिवाजीनगर, पुणे येथे ग्राहकांसाठी खुला ठेवण्यात आलेला होता. परंतु पुण्यातील ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून लोकांच्या आग्रहास्तव दिनांक ०९ फेब्रुवारी २०२० रात्री ८ वाजेपर्यंत धान्यमहोत्सवाचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री राजेंद्र साबळे, प्रकल्प संचालक आत्मा पुणे यांनी केले आहे.