मुंबई (वृत्तसंस्था) : संशोधन वृत्तीबरोबरच मूल्यांचे भानही नव्या पिढीत रुजवावे, असे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिक्षकांना केले आहे. शालेय शिक्षण विभागाने अमरावती जिल्ह्यात आयोजित केलेल्या नवव्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांनी आज केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
समाजात महिलांवर होणारे अत्याचार अस्वस्थ करतात या पार्श्वभूमीवर नव्या पिढीत नीती मुल्यांची जोपासना करणे आवश्यक आहे. नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करतानाच चांगल्या विचारांचा सकारात्मक पाठपुरावा करणेही गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.
प्रदर्शनात राज्यभरातल्या ३८३ विद्यार्थ्यांच्या अभिनव संशोधन प्रकल्पांचा समावेश आहे. त्यातल्या १०टक्के उत्कृष्ट प्रकल्पांची निवड राष्ट्रीय प्रदर्शनासाठी केली जाणार आहे.