तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून काळेश्वरम प्रकल्प उद्घाटनाच्या निमंत्रणासाठी सदिच्छा भेट

मुंबई : सिंचन सुविधामुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळेच काळेश्वरमसारख्या प्रकल्पांची आणि त्यासाठी राज्यांच्या परस्पर सहकार्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन तेलंगणातील महत्त्वाकांक्षी अशा काळेश्वरम सिंचन प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले. त्यावेळी चर्चेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, तेलंगणाच्या मंत्रिमंडळातील सदस्य आदी उपस्थित होते.

तेलंगणा राज्यातील या प्रकल्प उद्घाटनाचे निमंत्रण स्वीकारतानाच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री. राव यांच्या दूरदृष्टीचे आणि या प्रकल्पपूर्तीच्या वेगाचेही कौतुक केले. ते म्हणाले, सिंचन सुविधांच्या निर्मितीतूनच लोकांच्या जीवन उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो. भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी केंद्रित आहे. त्यामुळे कृषी सिंचन सुविधेच्या क्षमतेतून भारतीय अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळते. त्यामुळे महाराष्ट्रातही आम्ही सिंचन सुविधांच्या बळकटीकरणावर भर दिला आहे. त्याचसाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला वेग देण्याचा प्रयत्न आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी नदीत आणल्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. या ग्रीडमध्ये अकरा धरणांना जोडण्यात येणार आहे. यामुळे वारंवार अवर्षणाला तोंड देणाऱ्या या भागाला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पांसाठी राज्या-राज्यातील पाणी वाटपाबाबत संवाद वाढीस लागणेही गरजेचे आहे. त्यादृष्टीने काळेश्वरम हा प्रकल्प देशासाठी एक उत्तम उदाहरण ठरेल, असेही  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री. राव यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे महाराष्ट्र राज्याने या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी दिलेल्या सर्वतोपरी सहकार्यासाठी आभार व्यक्त केले. ते म्हणाले,महाराष्ट्राच्या सहकार्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होणे शक्य नव्हते. अनेक बाबतीत आपल्याकडून मिळालेल्या सहकार्यामुळेच हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला. महाराष्ट्राने या प्रकल्पासाठी केलेले सहकार्य तेलंगणाची जनता कधीही विसरणार नाही. हा प्रकल्प पुढील अनेक पिढ्यांसाठी त्यांच्या भविष्याला  आकार देणारा ठरणार आहे. त्यामुळे या पिढ्याही महाराष्ट्राप्रती कृतज्ञच राहतील.

या प्रकल्पाचे शुक्रवारी 21 जून रोजी उद्घाटन होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष निमंत्रित करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निमंत्रणाचा स्वीकार करतानाच मुख्यमंत्री श्री. राव यांचा सत्कार करून त्यांना, शिवछत्रपतींच्या प्रतिमेची कलाकृती भेट दिली. श्री. राव यांनीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा तेलंगणाच्या परंपरेप्रमाणे सत्कार केला.