* कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध विभाग युध्द पातळीवर कार्यरत
* लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करुन घ्यावी
* स्वगृही परतणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात पथके स्थापन
* केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार सर्व जिल्हयांमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी
पुणे : पुण्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचे विविध विभाग एकमेकांमध्ये समन्वय ठेवून युध्द पातळीवर काम करत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांनीही घराबाहेर न पडता, गर्दी टाळून सूचनांचे तंतोतंत पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी डॉ. म्हैसेकर बोलत होते.
कोरोना रुग्णांची माहिती देतांना विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात कोरोना बाधीत 2 हजार 388 रुग्ण असून 617 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 644 असून 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 93 रुग्ण गंभीर असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्हयात 2 हजार 122 कोरोना बाधीत रुग्ण असून 553 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 454 असून 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 86 रुग्ण गंभीर असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडावे, असे सांगून डॉ.म्हैसेकर म्हणाले, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्याबरोबरच मास्क, सॅनिटायझर व वेळोवेळी हातांच्या स्वच्छतेवर सर्वांनी भर देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोविड-19 ची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करुन घ्यावी. कोविड-19 रुग्णांना वैद्यकीय सुविधा देणाऱ्या रुग्णालयांसाठी पुरेसे पीपीई किट, मास्क उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत असून वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती तयार करण्यात आली आहे. ससूनमध्ये प्रायेगिक तत्वावर प्लाझ्मा थेरपी साठी परवानगी मिळाली आहे. एका व्यक्तीचे रक्तसंकलन करण्यात आले असून लवकरच कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपीव्दारे उपचार सुरु करण्यात येईल,असे डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.
आपल्या जिल्हयातून स्वगृही जाणाऱ्या तसेच पर जिल्हयातून आपल्या जिल्हयात येणाऱ्या नागरिकांची सोय करण्याकरीता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. परराज्यात अथवा पर जिल्हयात जाण्यासाठी इच्छुकांना कोणत्याही डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करुन ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. तथापी त्यांना ज्या भागात जायचे आहे, तेथील प्रशासनाची परवानगी आल्यानंतरच जाण्याची परवानगी दिली जाईल. केंद्र व राज्य शासनाचा निर्णय झाल्यास त्यांच्यासाठी सोशल डिस्टंन्सिंगचा विचार करुन विशेष रेल्वेची व बसेसची सोय करण्यात येईल. पुणे विभागात देखील काही ठिकाणाहुन रेल्वे व बसेसव्दारे विद्यार्थी, कामगार व अडकलेल्या नागरिकांना पाठविण्याबाबत विचार सुरु आहे, असेही ते म्हणाले. खाजगी गाडीने पर जिल्हयात जावू इच्छिणाऱ्या ३ व्यक्तींनाच चारचाकी वाहनातून जाण्यासाठी परवानगी दिली जाईल.
लॉकडाऊनबाबत केंद्र शासनाच्या सूचनांनुसार राज्याने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार विभागातील सर्व जिल्हयांमध्ये कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त शहरातील कन्टेंन्मेंट झोनसाठी तर ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक विविध आदेशांची अंमलबजावणी करत आहेत. झोपडपट्टी भागात अपुऱ्या जागेमुळे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन होत नसल्याने या भागातील रुग्ण्संख्या वाढत आहे. या ठिकाणी संस्थात्मक कॉरंन्टाईन होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, मास्क व सॅनिटायझरचे वाटप अशा उपाययोजना केल्या जात आहेत. कन्टेंन्मेंट झोनमधील नागरिकांनी कोणत्याही प्रकारे ये-जा न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हयात लॉकडाऊनमध्ये करण्यात येणाऱ्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराबाहेर तसेच ग्रामीण भागात उद्योगधंदे, वाईनशॉप सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तथापी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन न झाल्यास व दुकानाबाहेर गर्दी झाल्यास संबंधित दुकानाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले. वाढत्या रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 16 हजाराहुन अधिक बेडची तयारी करण्यात आली आहे. कोविड-19 सॅम्पल तपासणीचे प्रमाण वाढविण्यात येत असून दररोज सरासरी 850 च्या दरम्यान सॅम्पलची तपासणी करण्यात येत आहे. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून लवकरात लवकर कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर राज्यातून व पर जिल्हयातून पुणे जिल्हयात येण्यासाठी इच्छुक विद्यार्थी व नागरिकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यात येत आहे. याबरोबरच पर जिल्हयात जाणाऱ्यांचीही सोय करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत.
मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी कन्टेंन्मेंट झोनमधील कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. या भागात सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे,असे सांगितले. वेगवेगळया कारणास्तव आजारी असणाऱ्या रुग्णांनाही कोरोनाची लागण झाल्याचे ससून व रुबी रुग्णालयाच्या निदर्शनास आल्यानंतर योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांनी आतापर्यंत 1 हजार 219 विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात आली असून 1 हजार 700 प्रकरणे प्रलंबित असून त्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलीस विभागामार्फत या कामासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
प्रारंभी कोरोना प्रतिबंधक कामातील पोलीस विभाग व महानगरपालिका विभागाचे कर्मचारी दिलीप लोंढे, उमाबाई पाटोळे व रंजनाबाई चव्हाण यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.