मुंबई : जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या कायद्याची प्रचार-प्रसिद्धी प्रभावीपणे करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

जादूटोणाविरोधी कायद्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी श्री.पवार बोलत होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, जादूटोणाविरोधी कायद्याचा योग्य प्रचार आणि प्रसार होण्यासाठी सामान्य नागरिक, शिक्षक, पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, पत्रकार, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे नागरिक तसेच समाजातील इतर घटकांपर्यंत कायद्याची परिपूर्ण माहिती पोहोचावी यासाठी शासकीय पातळीवर वेगवेगळ्या जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे.

जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचार-प्रसिद्धीमुळे जनजागृती होईल. समाजातील गैरसमजुती दूर होतील. अंधविश्वासामुळे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल. समाजाचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. या प्रचार प्रसिद्धीसाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.