मुंबई : पुणे येथील महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुणे शहरातील महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे देशाची अस्मिता आहेत. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून ते नव्या पिढीसमोर येण्याची आवश्यकता आहे. पुणे येथील महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखत काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.