नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी बिमस्टेक राष्ट्रांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत असं आवाहन भारतानं केलं आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रणासंबंधीच्या बिमस्टेक राष्ट्रांच्या संमेलनात गृह राज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांनी काल नवी दिल्लीत यासंदर्भांतले भारताचे प्रयत्न आणि उपाययोजनांविषयी माहिती दिली.
या तस्करीला आळा घालण्यासाठी संबंधित राष्ट्रांनी आपले अनुभव आणि गुप्त माहितीची देवाण घेवाण करणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. सर्वच राष्ट्रांसमोर अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराचं संकट उभं असून त्यामुळे राष्ट्राची अर्थव्यवस्था बाधित होऊ शकते हे वेळीच लक्षात घेणं गरजेचं आहे, असं रेड्डी यांनी सांगितलं. समुद्रमार्गे होणारी तस्करी आणि दहशतवादी कारवायांचं प्रमाण गेल्या काही वर्षात कित्येक पटींनी वाढलं आहे, असं ही ते म्हणाले.