नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या २५ परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली. काश्मीरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारतानं उचललेल्या सकारात्मक पावलांची या शिष्टमंडळानं प्रशंसा केली. विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी, सुरक्षाविषयक स्थिती आणि या प्रदेशात परिस्थितीमध्ये होणारी सुधारणा याविषयी या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी चर्चा केल्याचं वृत्त आहे.

गेल्या दोन दिवसात या शिष्टमंडळानं मुख्य न्यायाधीश, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल, जिल्हा प्रशासनातले अधिकारी आणि नागरी समुदाय, व्यापारी आणि प्रसारमाध्यमांमधल्या सदस्यांशी चर्चा केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारतानं सकारात्मक पावलं उचलली आहेत. मात्र, उर्वरित निर्बंध लवकरात लवकर हटवण्याची गरज आहे, असं मत युरोपीय संघाच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरण प्रवक्त्या व्हर्जिनी बट्टू हेनरिकसन यांनी सांगितलं. यापूर्वी जम्मू काश्मीरला भेट देणाऱ्या 15 सदस्यांच्या शिष्टमंडळानं देखील याबाबत  सकारात्मक अहवाल दिला होता.