नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळच्या बाबा वर्दम थिएटर्सच्या २१ व्या नाट्यमहोत्सव अंतर्गत झालेल्या कै बाबा वर्दम स्मृती आंतरराज्य नाट्यस्पर्धेत सांगलीच्या लोकरंगभूमी संस्थेने सादर केलेल्या ‘पूर्णविराम’ नाटकाला वैयक्तिक सात पारितोषिकांसह सांघिक पहिला क्रमांक मिळाला.

दुसरा क्रमांक कोल्हापूरच्या परिवर्तनकाल फाउंडेशन निर्मित ‘ऱ्हासपर्व’ नाटकाला तर तिसरा क्रमांक कल्याणच्या अभिनय संस्थेच्या ‘घटोत्कच’ या नाटकाला मिळाला. पहिल्या तीन क्रमांकाना रोख रक्कम, फिरता  आणि कायस्वरूपी चषक देऊन गौरवण्यात आलं.

तसेच स्त्री पुरुष अभिनय, दिग्दर्शन, प्रकाशयोजना, रंगभूषा, पार्श्वसंगीत आणि नेपथ्य अशी वैयक्तिक पारितोषिक देण्यात आली. राज्यभरातली निवडक ७ नाटक या स्पर्धेत सादर झाली. शनिवारी सायंकाळी उशिरा लेखक दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, नेपथ्यकार नितीन नेरुरकर अशा मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघाना बक्षीस देण्यात आली.