नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मिरजेत मेडीकल हब निर्मितीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. मिरज सिव्हिलमधून बाहेर टाकलेल्या दोन बेवारस रूग्णांच्या मृत्यूप्रकरणी आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांची गय करणार नसल्याचेही यड्रावकर यांनी स्पष्ट केले.

राज्यमंत्री यड्रावकर यांनी मिरज सिव्हीलमध्ये आढावा बैठक घेऊन वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील रिक्त जागा, सुविधा, खाटांची संख्या याबाबत माहिती घेतली. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्यासह महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यड्रावकर म्हणाले, मिरजेची वैद्यकीय परंपरा मोठी आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची संख्या जास्त आहे. मात्र वैद्यकीय उपचाराबाबत ख्याती असलेल्या मिरजेत रूग्णांची संख्या कमी होत आहे.

मिरज मेडीकल हब होऊ शकते. त्यासाठी वैद्यकीय व्यवसायीकांना शासनाकडून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. मिरज सिव्हीलमधील रिक्त पदे भरून वैद्यकीय उपचार  देण्यात येतील. सिव्हीलसाठी निधी कमी असल्याने राज्यशासन निधी उपलब्ध करून देईल. सिव्हीलमध्ये केवळ खाटांची संख्या वाढवून उपयोग नाही तर त्याप्रमाणात वैद्यकीय कर्मचा-यांची आवश्यकता आहे.

अद्याप शासनाच्या नावावरच असलेली सिव्हील हॉस्पिटलच्या मालकीच्या जागा सिव्हीलच्या नावावर करण्यात येतील. मिरज सिव्हीलमधून तीन बेवारस रूग्णांना बाहेर टाकण्यात आल्याने त्यातील दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांची गय करणार नसल्याचेही यड्रावकर यांनी सांगितले.